बदलापूर :- सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ज्यांना करोनाची लागण झाली आहे त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता टॉसिलिझम्ब एक्टेमेरिया 400 एमजी तसंच रेमिडीसेव्हर 100 एमजी या दोन महागड्या इंजेक्शनची गरज असते. मात्र, ही इंजेक्शन मुंबई घाटकोपर येथील एक डिस्ट्रीब्यूटर सोडल्यास इतर ठिकाणी कुठेच मिळत नसल्याने कुणी इंजेक्शन देत का इंजेक्शन असे म्हणण्याची कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातलगांवर आली आहे आली आहे.
अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर ह्या शहरातच नव्हे तर जवळपास संपूर्ण जिल्ह्यात टॉसिलिझम्ब एक्टेमेरिया 400 एमजी तसंच रेमिडीसेव्हर 100 एमजी इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली आहे.मिळेल त्या मार्गाने, सोशल मीडियाचा आधार घेत अथवा नातलग, मित्र, राजकीय पक्षांचे पुढारी यांना साकडे घालत इंजेक्शन मिळावे याकरिता आर्त हाक द्यावी लागत आहे.
रुग्णांचे आधार कार्ड कोरोना अहवाल तसेच रुग्णालयातील डॉक्टरांकडून देण्यात येणारे प्रेस्क्रीप्शन या आधारे इंजेक्शन उपलब्ध होत आहे परंतु इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या नागरिकांना आता इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे हजारो रुपयांचा भुर्दंड बसत आहे.
जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामीण भागातील रुग्णांना हे इंजेक्शन मिळावे याकरिता जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे अशी मागणी होत आहे तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यात औषधांवर नियंत्रण ठेवण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावे अशीही मागणी होत आहे
लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ लोकांवर आली असताना हजारो रुपयांचे हे औषध लोकांना परवडणार कसं? याच्या किंमतींवर सरकार नियंत्रण आणणार का? लोकांना सरकार दिलासा देणार का? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे कुणाकडेच नाही.