बदलापूर :- ठाणे जिल्हा क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केवळ त्या त्या ठिकाणचे हॉटस्पॉट बंद करुन विशेष फरक पडणार नाही. असे कारण देत ठाणे जिल्हाधिकारी यांनी ठाणे जिल्हयातील सर्व नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात दि. 2 जुलै पासून पुन्हा एकदा लोक डाऊन जाहीर केले. परंतु दोन जुलै ते 12 जुलै या काळात बदलापूर शहरात मात्र 586 रुग्णांची वाढ असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन चे आदेश दिले त्यादिवशी म्हणजेच एक जुलै रोजी बदलापूर शहरात ८०७ रुग्ण होते त्यापैकी ३९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते आणि ३९८ रुग्णांवर पुढील उपचार सुरू होते. तर आज 12 जुलै रोजी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १३९३ इतकी झाली आहे त्यापैकी ७१४ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.६५९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तब्बल 84 दिवसांच्या लॉकडाऊन नंतर १ जूनपासून राज्य शासनाने अनलॉक ची प्रक्रिया सुरू केली त्यावेळी बदलापूर शहरात केवळ २२९ रुग्ण होते तर ठाणे जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊन रिटर्न हे घोषणा केली त्या वेळी शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ८०७ इतकी होती याचा अर्थ अनलॉकच्या ३१ दिवसांच्या काळात ५७८ रुग्ण वाढले होते.
आता पुन्हा एकदा जिल्हाधिकारी ठाणे यांनी लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढविले आहे. लॉकडाउनच्या काळातही रुग्ण संख्या कमी झालेली नाही किंवा मंदावलेली नाही अशावेळी कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हे खरंच प्रभावी अस्त्र आहे का असा? प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.