बदलापूर : शासनाने दर निर्धारित केलेले असतानाही बदलापुरातील खाजगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांची लूट केली असल्याचा आरोप ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व भाजपाचे माजी शहराध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केला आहे. या सर्व रुग्णालयांतील बिलांचे लेखापरीक्षण करून बिलाची वाढीव रक्कम रुग्णांना परत मिळावी अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील खाजगी कोविड रुग्णालयांच्या बिलांबाबत नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. खाजगी कोविड रुग्णांलयाना शासनाने दर निर्धारित करून दिले आहेत. त्यानुसारच रुग्णांना दर आकारणी करणे सक्तीचे असताना या रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा बिले देऊन नागरिकांची एकप्रकारे लूट केली असल्याचे संभाजी शिंदे यांचे म्हणणे आहे. शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका व इतर महानगरपालिकांनी या सगळ्या बिलांची पुनर्तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक केली आहे. त्याच धर्तीवर कुळगाव बदलापूर नगर परिषदेनेही बदलापुरातील खाजगी कोविड रुग्णालयांनी दिलेल्या बिलांची तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षकांची नेमणूक करावी. गेल्या दोन महिन्यात खाजगी कोविड रुग्णालयांनी दिलेल्या बिलांची या लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करून वाढीव बिलाच्या रकमेचा पुन्हा रुग्णांना परतावा देण्यात यावा, अशी संभाजी शिंदे यांची मागणी आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी केली असल्याचे संभाजी शिंदे यांनी सांगितलेकोणत्याही व्यक्तीकडून वीस हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोख स्वरूपात घेऊ नये असे आयकर विभाग, आरबीआय व अर्थमंत्रालयाचे सक्त निर्देश आहेत. असे असताना गेल्या दोन महिन्यांच्या काळात बदलापुरातील खाजगी कोविड रुग्णालयांनी बिलासाठी रुग्णांकडून लाखो रुपये रोख स्वरूपात घेतले आहेत.याबाबतही या रुग्णालयांची चौकशी करण्यासाठी नगर परिषदेने आयकर विभागाला कळवावे, अशी मागणीही आपण या निवेदनाद्वारे केली असल्याचे संभाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.