बदलापूर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना संकटाच्या काळात ्रंट लाइनर म्हणून काम करणार्या कुळगाव बदलापूर नगरपालिका ३०० सफाई कर्मचाऱ्यांची मोफत अँटी जेन तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापूर शहर अध्यक्ष तथा गटनेते कॅप्टन आशिष दामले यांनी कुळगाव बदलापूर नगरपालिकेला ३०० किट उपलब्ध करून दिले आहेत.
बदलापूर शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना देखील शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सफाई कामगार महत्वाची भुमिका बजावत आहे. नियमित स्वच्छता ठेवताना सफाई कर्मचारी हे कोरोना संकट काळात देखील अविरतपणे आपली सेवा बजावत आहेत. मात्र त्यांची अद्याप पर्यत स्वॅब टेस्ट किंवा इतर तपासणी झालेली नाही.
त्यामुळे फ्रन्टलाइन वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्याचा निर्धार दामले यांनी केला आहे. अजित पवार यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून शहरातील सफाई कामगारांची तपासणी करण्यात येणार आहे.
तसेच शहरातील ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू सहा हजार कुटुंबांना मोफत धान्य किट देण्यात येणार आहे. यामध्ये तांदूळ, तूरडाळ, चणाडाळ, चहा पावडर, साखर यांची किट तयार करून घरोघरी जाऊन या वस्तू वाटप करणार असल्याचे आशिष दामले यांनी सांगितले.