पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वच्छतेबाबतच्या 'स्वच्छ सर्वेक्षण-२०२०' च्या निकालांची घोषणा केली आहे. त्यानुसार मध्य प्रदेशातील इंदूरला सलग चौथ्या वर्षी स्वच्छतेत अव्वल स्थान प्राप्त झाले आहे.. नवी मुंबईला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. तर अंबरनाथ आणि बदलापूर अनुक्रमे १८ व्या आणि ४७ व्या स्थानावर, तर तर महाराष्ट्रात तिसरा आणि १५ व्या क्रमांकावर आले आहेत.
अंबरनाथ शहर स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर रहावे याकरिता पालिका प्रशासनाकडून आजपर्यंत अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. संपूर्ण शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचे योग्य ते नियोजन, घंटागाडी दारोदारी योजना, कचऱ्याचे रूपांतर खतामध्ये करण्यासाठी कार्यरत असणारे खत प्रकल्प, भुयारी गटार योजना, मलजल प्रक्रिया केंद्र यांसारख्या यशस्वी उपाययोजनांमुळे आणि शहरातील नागरिकांच्या सहभागामुळे नुकत्याच झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात संपूर्ण देशातून अंबरनाथने १८वा क्रमांक पटकावला आहे. मागील वर्षी झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अंबरनाथने ३०वा क्रमांक पटकावला होता. त्यांनतर एकाच वर्षाच्या कालावधीत शहराने शिस्तबद्ध उपाययोजनांमुळे देशात १८वे आणि राज्यात ३रे स्थान पटकावले आहे. तर कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने यंदाच्या वर्षीदेशात ४७ वा क्रमांक पटकावला आहे. मागील वर्षी ५१ वा क्रमांक तर २०१८ मध्ये ११३ वा क्रमांक पटकावला होता. यंदाच्या वर्षी कु ब न परिषदेने राज्यात १५ वा क्रमांक पटकावला आहे.
अंबरनाथ शहराला मिळालेला हा राष्ट्रीय स्वरूपाचा सन्मान हा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या बरोबरच अहोरात्र काम करणाऱ्या सफाई कामगार आणि या शहरातील प्रत्येक नागरिकाचा हा बहुमान आहे. स्वच्छता ही सेवा आणि संस्कार असून महाराष्ट्राच्या संत परंपरेची शिकवण आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आता स्वच्छ राहण्याबरोबरच निरोगी राहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असल्याने स्वच्छ, सुंदर आणि निरोगी अंबरनाथ राखण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया.
डॉ.प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी
अंबरनाथ नगरपरिषद