बदलापूर : यंदा करोनाचा प्रादुर्भाव पाहता गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन कुळगाव बदलापूर नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन नगरपालिकेच्या तर्फे करण्यात आले आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे त्यानुसार गृह विभागाने गणेशोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपतीची मूर्ती ४ फुटांची तर घरगुती गणेश मूर्ती २ फुटांची असावी, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे. त्याचे पालन करतानाच आगमन आणि विसर्जन मिरवणुका निघणार नाहीत, गणेशोत्सवात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा सूचना आणि निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन भाविकांना केले आहे. या करिता नगरपरिषदेने लिंक जारी केली आहे.
कुळगांव बदलापूर नगरपरिषद हद्दीतील गणेश भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की, कोरोना-१९ प्रादुर्भाव असल्याने गणपती विसर्जन करिता नगरपरिषदेस मुर्ती दान देणे कामी खालील लिंकद्वारे नोंदणी करावी.