अंबरनाथ :- सद्यस्थितीत संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत आहे. मागील चार ते पाच महिने सर्वच नागरिक कोरोना विषाणूच्या दहशतीखाली जगत आहेत. दरम्यानच्या काळात आलेले गुढी पाडवा,होळी, अक्षय तृतीया, इत्यादी सणवार देखील नागरिकांना मनमोकळ्यापणाने साजरे करता आले नाहीत. परंतु अंबरनाथमध्ये पालिकेद्वारे दंत महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोव्हिडं हॉस्पिटल मधील रुग्णांनी मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या भविष्यात अनेक रंग भरले. कोव्हीड रुग्णालयात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी एकूण ८१ रुग्णांनी आयोजित चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. रुग्णांनी कोरोनाची भीती दूर सारत विविध चित्र रेखाटत स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.
यंदाचा गणेशोत्सव हा अनेक नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे. शहरातील नागरिक देखील आपल्या कुटुंबियांसमवेत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत. परंतु ज्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्यावर नगरपालिकेच्या कोव्हिडं रुग्णालयात उपचार सुरु आहेत त्यांना रुग्णालयात एकाकीपणा वाटू नये आणि त्यांनीदेखील गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा या हेतूने रुग्णालयातील डॉक्टरांमार्फत सर्व रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम सर्वानी रुग्णालयात असणाऱ्या गणेशमूर्तीचे पूजन व आरती केली आणि त्यानंतर आयोजित स्पर्धेत सर्व वयोगटातील रुग्णांनी अगदी आनंदाने भाग घेतला. यातील सर्वात कुतूहलाची गोष्ट म्हणजे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७० वर्षांच्या आज्जीनी यात सहभाग देखील नोंदवला आणि बक्षीस देखील पटकावले. कोरा कागद आणि विविध रंग हाती येताच सर्व रुग्णांनी सुंदरशी चित्र रेखाटत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आपण याठिकाणी उपचार घेण्यासाठी नव्हे तर आयोजित चित्रकला स्पर्धेत भाग घेण्यासाठी उपस्थित आहोत असेच एकंदरीत रुग्णांमध्ये वातावरण दिसून येत होते.
शहराच्या पश्चिम भागात पालिका प्रशासनामार्फत दंत महाविद्यालयात कोव्हीड रुग्णालय चालविले जाते. आजपर्यंत या रुग्णालयातून एकूण २ हजार ३८ रुग्ण उपचारार्थी बरे झाले आहेत. या रुग्णालयाचा रुग्ण बरे होण्याचा दर हा तब्बल ९६ टक्के इतका झाला आहे. रुग्णालयात रुग्णांसाठी योग्य त्या वैद्यकीय सेवांसमवेतच त्यांच्या मनोरंजनाची देखील उत्तम सोय केली आहे. जेणेकरून कोरोना झाल्यानंतर रुग्ण कोणत्याही मानसिक तणावात जाणार नाही याची उत्तम काळजी या रुग्णालयात घेतली जाते. रुग्णांसाठी कॅरम, बुद्धिबळ,लुडो यांसारखे विविध खेळ आणि त्याचबरोबर रुग्णालयात प्रोजेक्टर आणि टीव्हीसह इंटरनेटची देखील सुविधा पुरविण्यात आली आहे. रुग्णालयात असणारे उत्तम खेळीमेळीचे वातावरण यामुळे रुग्णांमध्ये निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा यासर्व गोष्टींमुळे अंबरनाथ पालिका संचलित दंत महाविद्यालयातील कोव्हिडं रुग्णालय हे उत्तम वैद्यकीय सेवांसह माणुसकीचा ओलावा जपणारे राज्यातील एक आदर्श रुग्णालय ठरतांना दिसून येत आहे.