जगभरात प्रसिद्ध, लोकप्रिय आणि आवडीने खाल्ला जाणारा खाद्यपदार्थ म्हणजेच मुंबईचा वडापाव, आपला वडापाव, आज २३ ऑगस्ट, जागतिक वडापाव दिन ! वडापाव चा जन्म कसा झाला ? याचा संपूर्ण प्रवास जाणून घेऊया. ...
मुंबई... आमची मुंबई. ह्या शहराची बात काही औरच आहे. असंख्य लोकांची स्वप्न पूर्ण करणारी मुंबई आणि स्वप्न बघू पाहणाऱ्यांना ते पूर्ण करण्यासाठी मिळणारी प्रेरणा म्हणजे मुंबई. कितीही मोठी संकट आली तरी अलगद पणे ती पचवण्याची ताकद असलेली मुंबई. खरं तर हि मुंबई चार आधारस्तंभांवर घट्ट पाय रोऊन उभीय; आणि ते आधारस्तंभ म्हणजे येथील लोकल ट्रेन, संपूर्ण जगाला आकर्षित करणार बॉलीवूड, जगाच्या पाठीवर आपली वेगळी ओळख निर्माण करणारा येथील ' मराठी माणूस ', आणि ज्याच्या शिवाय मुंबई अधुरी आहे ; तो म्हणजे ' मुंबईचा वडा-पाव '.
वडा-पाव हा एक फक्त खाद्यपदार्थ नाही; तर मुंबईचा एक अविभाज्य भाग झाला आहे. खरंतर वडा-पाव हा दोन संस्कृतींचा मेळ आहे; मराठी वडा आणि पोर्तुगाली पाव. मराठी माणसाने सुद्धा स्वतःचा व्यवसाय चालु करावा ह्या विचाराने १९६६ साली दादर येथील ''अशोक वैद्य '' यांनी वडा-पाव विकण्यास सुरवात केली. त्या काळात गिरणी कामगारांना कमी वेळेत आणि कमी पैशात भूक भागवण्याचा साधन म्हणजे वडा-पाव; पण आज गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत कोणीही वडा-पाव खाण्याचा मोह आवरू शकला नाही. दोन आण्यांपासून सुरु झालेला ह्याचा प्रवास आज अनेक महागड्या ठिकाणी शंभर रुपयांपर्यंत येऊन पोहचला. पण त्याच्या वाढत्या किंमती बरोबर दिवसेंदिवस त्याचा रुबाब सुद्धा वाढतच आहे. परदेशातून येणाऱ्या आणि खाद्यभ्रमंती करणाऱ्या पर्यटकांमध्ये ' इंडियन बर्गर ' म्हणून प्रसिद्ध असलेला असा हा वडा-पाव गेल्या ५४ वर्षांपासून सर्वांच्या जिभेवर राज्य करतोय.
सुरुवातीला बरीच वर्ष केवळ बटाटा वडा खाल्ल्या जायचा, बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात काढून ते तेलात तळून बटाटेवडे बनवायला सुरुवात झाली त्यानंतर काही दिवसांनी बटाटा वाड्याच्या साथीला पाव आला आणि तेव्हापासून बटाटा वडा आणि पाव ही जोडी प्रसिद्ध झाली.
शाळकरी मुलं , कॉलेजिअन्स , सेलिब्रिटी , राजकारणी सर्वांनाच ह्याने भुरळ घातलेली आहे. एखाद्याने स्वतःला मुंबईला सोपवून द्यावे असंच काहीस वडा-पाव च देखील आहे. काही जण विचारतात कि वडा-पाव च का ?. पण काही प्रश्नांची उत्तर शब्दात सांगता येतातच असं नाही. त्याच उत्तर दिसत '' दोन दिवसांपासून अन्नाचा एक कण हि पोटात गेलेला नसतो आणि भीक मागून का होईना पण भूक भागवण्यासाठी ; वडा-पाव चा पहिला घास तोंडात गेल्यानंतर चेहऱ्यावर झळकलेल्या समाधानामध्ये '' त्याच उत्तर दिसत '' एकच वडा-पाव दोन मित्रांनी वाटून खाल्लेल्या मैत्री मध्ये '' त्याच उत्तर दिसत '' दिवसभर राबून मिळालेल्या पैशांमध्ये मुलांसाठी घरी खाऊ म्हणून वडा-पाव घेऊन जाणाऱ्या बापाच्या आनंदाने भरलेल्या डोळ्यांमध्ये ''.
७० च्या दशकात चालु झालेला हा वडा-पाव चा प्रवास , ह्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
मुंबईतील धीरज गुप्ता या तरूणाने जम्बो किंग नावाने वडापावला परदेशी ओळख निर्माण करून दिली आणि आज चीज वडा पाव शेजवान वडा पाव मसाला वडापाव स्पीड कोन वडापाव यासारखे भन्नाट कॉम्बिनेशन उपलब्ध आहेत. वडापाव सुरू झाला त्यावेळी तो 10 पैशाला मिळायचा आज हाच वडापाव पंचतारांकित हॉटेल किंवा मॉलमध्ये 80 ते 100 रुपयांपर्यंत मिळतो.
' ज्या प्रमाणे आई मुलाचं नातं असत तसच काहीस नातं हे मुंबई आणि वडा-पाव च देखील आहे.
कितीही बाहेरील पदार्थ आले तरी वडा-पाव च स्थान हे अटळच राहणार.
- निखिल