बदलापूर: कुळगाव बदलापूर नगर पालिका क्षेत्रात कोरोना संकटाच्या काळात कोविड-१९ सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना गेल्या तीन महिन्यापासून प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित रहावे लागले असल्याचे समोर आले आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात २ मे पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस कोविड-१९ सर्वेक्षणाचे कामकाज करीत आहेत. या कामकाजाचे दररोजचे हजेरी रिपोर्ट व सर्वेक्षण शीट्स देण्यात आलेल्या निर्देशानुसार सर्वेक्षण सुपरवायजर यांच्याकडे जमा करण्यात आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत हा प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाही.
आमच्या कामकाजाचा आढावा घ्यावा,आणि हा प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी मागणी या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.