बदलापूर :संपूर्ण देश हा कोरोना या विषाणूच्या विरोधात लढत आहे़. त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रक्तदान शिबिरांची आवश्यकता बोलून दाखविली होती.
राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याचप्रमाणे राज्यात अवघ्या 15 ते 20 दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यालाच प्रतिसाद देत अनेक मंडळे ,संस्था रक्तदान करण्यासाठी पुढे सरसावले आहे.याकार्यात आपलाही खारीचा वाटा असावा याहेतूने निळकंठ हिल्स उपवन सोसायटीने पुढे येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत शिबिराचे आयोजन केले होते.
रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे.एकाने रक्तदान केल्यास त्यातून चौघांना जीवनदान मिळते. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. समाजात रक्तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करुन जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करुन रक्तदान वाढवणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे असे आवाहन करीत संकुल परिसरातुन फेडरेशन पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसांपासून सोसायटीतील रहिवाशी आणि सदस्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते त्यास उत्तम प्रतिसाद देत जवळपास १०० सदस्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष कॅ. आशिष दामले, मा. नगरसेवक प्रभाकर पाटील, भारत पाटील तसेच अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन सोसायटीच्या उपक्रमाची प्रशंसा देखील केली.
निळकंठ हिल्स उपवन मधील सदस्य रमेश शिंदे यांनी सोसायटी फेडरेशनने रक्तदान शिबिराचे आयोजन करावे अशी संकल्पना मांडली आणि त्यास संकुलातील ६ हि इमारतीमधील पदाधिकारी आणि सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुख्य म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत तसेच राजावाडी हॉस्पिटल मधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.