बदलापूर : गेल्या काही वर्षांमध्ये भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे. त्यातच गेल्या सहा महिन्यांपासून बदलापुरातील ग्राहकांची दूरध्वनी सेवा बंद आहे. करोना टाळेबंदीत ग्राहकांना बीएसएनएलचा आधार मिळण्याची आशा होती. मात्र, पश्चिमेला बस स्थानकाजवळ असलेले बीएसएनएलचे कार्यालय काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना तक्रारींसाठी पूर्वेतील औद्य्ोगिक वसाहतीमधील कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.
शहरातील बीएसएनएल ग्राहकांची फरफट गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. वेळेवर दुरुस्ती साहित्य उपलब्ध होत नसल्याने ज्या वाहिन्या तुटल्या आहेत, त्यांची जोडणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक ग्राहकही बीएसएनएलपासून तुटले आहेत. तर नव्या वाहिन्या टाकल्या जात नसल्याने नवा ग्राहक जोडणे अशक्य झाले आहे. त्यातच करोना काळात बंद पडलेले अनेक दूरध्वनी गेल्या सहा महिन्यांपासून बंदच असल्याचे समोर आले आहे. करोना टाळेबंदीच्या काळात नेहमीप्रमाणे अधूनमधून दूरध्वनी बंद होत होते. मात्र तक्रार करण्याची योग्य सुविधा नसल्याने तक्रार केली जात नव्हती. मात्र मे ते जून महिन्याच्या काळात बदलापूर पश्चिमेतील अनेक दूरध्वनी बंद पडले. त्यानंतर आजतागायत हे दूरध्वनी सुरू होऊ शकलेले नाहीत. यापूर्वी दूरध्वनी बंद पडल्यानंतर पश्चिमेतील बस स्थानकासमोर असलेल्या कार्यालयात तक्रार करण्यासाठी जाता येत होते. मात्र बीएसएनएल प्रशासनाने हे कार्यालयही काही महिन्यांपूर्वी बंद केले आहे. त्यामुळे आता पूर्वेतील दोन ते अडीच किलोमीटर दूरवरच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या कार्यालयात जाणे परवडत नसल्याने तक्रार करण्याचे सोडून दिल्याची प्रतिक्रिया अनिल पालये यांनी दिली. त्यामुळे इच्छा असूनही बीएसएनएलची सेवा घेऊ शकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अशा असंख्य ग्राहकांवर बीएसएनएल प्रशासनाने दूरध्वनी बंद करण्याची वेळ आणली आहे.
ग्राहक संख्येतही घट
अंबरनाथ आणि बदलापूर शहरात बीएसएनएल ग्राहकांची मोठी संख्या होती. अंबरनाथमध्ये १५ वर्षांपूर्वी सुमारे २० हजार ग्राहक होते, तर बदलापूरातही २००५ मध्ये ११ हजार ग्राहक होते. डिसेंबर २०१९ मधील आकडेवारीनुसार अंबरनाथ शहरात सध्या अवघे ५ हजार ग्राहक उरले आहेत, तर बदलापूरमध्ये २ हजार ९७० ग्राहक उरले आहेत. गेल्या वर्षभरात नव्या जोडण्यांची संख्याही अवघी शंभराच्या घरात आहे.