सोसायटीच्या आवारात, टेरेसवर न्यू इयर सेलिब्रेशन नको : पोलिसांनी सोसायट्यांना बजावल्या नोटिसा



बदलापूर : नववर्ष आता काही तासांवर येऊन ठेपल्याने सर्वानाच न्यू इयर सेलिब्रेशनचे वेध लागले आहेत. अनेकांनी हॉटेल,रिसॉर्ट,फार्महाऊसवर तर काहींनी सोसायटीतच न्यू इयर सेलिब्रेशनचे बेत आखले आहेत. मात्र सोसायटीच्या आवारात, टेरेसवर सेलिब्रेशन करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे सोसायटी परिसरात वा सार्वजनिक ठिकाणी न्यू इयर सेलिब्रेशनच्या तयारीत असलेल्यांचा हिरमोड झाला आहे. 
                बदलापूर पश्चिम पोलिसांनी कलम १४९ अन्वये सर्व हौसिंग सोसायटयांना याबाबतच्या नोटिसा बजावल्या आहेत. नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर न पडता घरातल्या घरात साधेपणाने नववर्षाचे स्वागत करावे, बागेत,रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, नववर्ष स्वागतासाठी इमारतीच्या गच्चीचे गेट बंद करून कोणासही टेरेसवर जाऊ देऊ नये, सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करू नये, ३१ डिसेंबर रोजी नागरिकांनी खाडी, नदी किनारी, घाटावर सार्वजनिक रस्त्यावर बागेत, मैदानात, इमारतीच्या आवारात,टेरेसवर,चौकात जाऊ नये. ६० वर्षावरील नागरिक तसेच लहान मुले यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने कोणत्याही प्रकारचे धार्मिक/ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिकस्थळी गर्दी होण्याची शक्यता असल्याने अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे. असे आवाहन या नोटीसद्वारे करण्यात आले आहे. नूतन वर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यावर बंदी असल्याचेही या नोटीसद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. या सूचनांचे.नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस गावडे यांनी दिला आहे.
   सध्या कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्रिटनची राजधानी लंडनसह पूर्व इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. हा विषाणू अगोदरच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक घातक व वेगाने फैलावत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन, गृहविभाग यांच्यातर्फे नागरिकांनी जुन्या वर्षाचा समारोप व नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ठाणे शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार रात्री ११ ते सकाळी ६ वा. दरम्यान संचारबंदीचे आदेश लागू असून त्या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, हॉटेल, रेस्टोरंट,बार, ढाबे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...