वाचनालय हि शहराची सांस्कृतिक श्रीमंती : डॉ. उदय निरगुडकर

 


दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्याची सूचना 
बदलापूर: साहित्य गौरव ग्रंथालयात लाखापेक्षा अधिक पुस्तके आहेत हि खरी शहराची सांस्कृतिक श्रीमंती आहे. आता जमाना बदलत चालला आहे. सोशल मीडिया आणि संगणकीय तंत्रज्ञान फोफावत चालले आहे. या नवीन तंत्रज्ञाचा अवलंब करून आपण या सर्व दस्तावेजांचे संगणकीकरण केले तर केवळ ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर जगातील वाचक आणि अभ्यासक याचा लाभ घेऊ शकतील असा विश्वास डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केला. 
    राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या पुढाकाराने आणि ग्रंथसखाचे श्याम जोशी यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या साहित्य गौरव ग्रंथालयाला प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे आणि डॉ. उदय निरगुडकर यांनी भेट दिली.  यावेळी बोलताना डॉ. उदय निरगुडकर यांनी वरील विश्वास व्यक्त केला. कॅप्टन आशिष दामले यांनी स्वागत, श्याम जोशी यांनी आभार मानले. ग्रंथपाल सौ. अर्चना कर्णिक यांनी या वाचनालयाविषयी सविस्तर माहिती दिली.
     ऑक्सफर्ड वाचनालय हे मोठे वाचनालय आहे. या वाचनालयाचा अर्थसंकल्पच मुळी आपल्या राज्याच्या अर्थसंकल्प एवढा असल्याने ते वाचनालय हे अद्यययावत करण्यात आले आहे. प्रशस्त इमारत आणि मोकळी जागा असल्याने तेथील वातावरण वेगळे आहे. बदलापूरच्या या साहित्य गौरव ग्रंथालयात आल्यावर ती आठवण होत असल्याचे डॉ. उदय निरगुडकर म्हणाले. दस्तावेज संगणीकरणाबाबत बोलताना ते म्हणाले केंद्र सरकारने याबाबतीत चांगले कार्य केले आहे. प्रकाश जावडेकर यांनी यात मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे केंद्रातील प्रत्येक मंत्रिमंड्ळाच्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले त्याची सविस्तर माहिती एका क्लिकवर मिळते. याच प्रमाणे बदलापूर मधील या साहित्य गौरव ग्रंथालयातील या लाखो ग्रंथांचे संगणकीकरण करून ठेवल्यास केवळ ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील वाचक आणि अभ्यासक या साहित्य संपदेचा लाभ घेऊ शकतील असा विश्वास डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केला. 
       बदलापूरच्या या वाचनालयात होणाऱ्या ऑडियो, व्हिडीओ मुलाखती, कार्यक्रमाचे इतिवृत्त, सविस्तर माहिती साठवून ठेवली तर त्याचाही चांगला उपयोग होऊ शकतो असे डॉ. उदय निरगुडकर यांनी सांगितले. भविष्यात प्रिंट पेक्षा डिजिटलला अधिक महत्व येणार आहे. मुलांनी आणि सर्वानीच फॊरकास्ट ऐकले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. बडोदा येथील सयाजीराव गायकवाड यांनी वाचनासाठी सर्वांनाच प्रोत्साहन दिले होते. वाचकांना प्रोत्साहन दिल्याने अनेक मोठी माणसे घडल्याची असंख्य उदाहरणे आपल्याला माहिती आहेत. बदलापूर मध्ये श्याम जोशी आणि आशिष दामले यांनी असेच काम सुरु केले आहे. भविष्यात बडोदा येथील वाचक येथे येतील असा विश्वासही डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केला. 
      आता पर्यंत आम्ही श्याम जोशी या ग्रंथवेड्या माणसाच्या ग्रंथसखा मध्ये नेहमीच यायचो. त्यांच्या त्या गुहेत शिरलो कि वेगळेच वातावरण अनुभवयास मिळायचे.त्यात विविध प्रकारच्या साहित्याची माहिती मिळायची. आता मात्र त्यांनी आशिष दामले यांच्या सहकार्याने इतके प्रचंड वाचनालय सुरु करून खऱ्या अर्थाने साहित्याचा गौरव केला असल्याची प्रतिक्रिया कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केली. 

      



 
 

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...