अंबरनाथमधील कचऱ्याला विरोध; 'डम्पिंग' प्रश्न पेटणार!
आमदार कथोरे यांनी घेतली आक्रमक भूमिका
बदलापूर :- अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी अंबरनाथ नगरपरिषद व बदलापूर नगरपरिषद हद्दीत निर्माण होणा-या घनकच-याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन्ही नगर पालिकांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते तसेच अंबरनाथचा कचरा बदलापूरच्या हद्दीमध्ये टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे मुख्याधिकारी यांच्या पत्रातून स्पष्ट होत होते , त्यास आमदार किसन कथोरे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तसा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशाराही त्यांनी आपल्या पत्रातून दिला आहे.
अंबरनाथ फॉरेस्ट नाका येथील डम्पिंगची कचरा साठवण क्षमता संपली असून, टाकण्यात आलेला कचरा वारंवार पेट घेतो. येथील दर्गधीमळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर ह्या दोन्ही शहरातील घनकचरा प्रकल्प अहवाल (डि.पी.आर) सल्लागारामार्फत तांत्रिक मुल्यमापन आय.आय.टी मुंबई यांचेकडून करण्यात येवून शासनाकडे मंजुरीकरिता सादर केल्याने तसेच घनकच-याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन्ही नगर पालिकांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन अंबरनाथ नगरपरिषद मुख्यधिकारी यांनी केले होते, त्याअनुषंगाने कुळगाव बदलापूर नगरपरिषद लोकप्रतिनिधींना बैठकीचे आमंत्रण देण्यात आले होते. यासंदर्भात आमदार कथोरे यांनी बदलापूर पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडसमोर दिवाणी न्यायालय इमारतीचे काम सुरू आहे. यामुळे अंबरनाथमधील घनकचरा बदलापूरमध्ये टाकण्याचा घाट सुरू असल्याचा आरोप आमदार कथोरे यांनी केला आहे. दुसऱ्या शहराच्या हद्दीमध्ये आपला कचरा टाकणे चुकीचे आणि अन्यायकारक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. अंबरनाथच्या बेकायदा कचराभूमीवरून उच्च न्यायालय, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि राष्ट्रीय हरित लवाद आदी सरकारी संस्थांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला खडेबोल सुनावले होते. शहरातील नागरिकांकडूनही कचऱ्याच्या होणाऱ्या त्रासाविरोधात अनेकदा नाराजीचा सर लावला होता. स्पेनमधील कंपनीच्या सहकार्याने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांचा कचरा एकत्र जमा करून त्यावर बंदिस्त कारखान्यात प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने हालचालींनी वेगही घेतला होता. मात्र पुढे काहीच ठोस कार्यवाही झाली नसल्याचे कथोरे यांनी सांगितले.