बदलापूर :गेल्या वर्षभरात करोनाने अक्षरशः थैमान घातले. या महामारीच्या काळात शासकीय आणि आरोग्य यंत्रणेच्या बरोबरीने पत्रकारांचेही योगदान अतिशय महत्वाचे होते, मात्र पत्रकारांकडे त्यामानाने दुर्लक्ष झाले आहे. कॅप्टन आशिष दामले यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा केलेला सत्कार हा अतिशय महत्वाचा आहे. या काळात घरात अडकून पडलेल्या लहान मुलांचे भवितव्य कसे आहे याबाबत पत्रकारांनी अभ्यास करावा महत्वाची अशी सूचना प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले आणि ग्रंथसखाचे प्रमुख विश्वस्त श्याम जोशी यांच्या पुढाकाराने पत्रकारांचा सत्कार कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी अशोक नायगावकर यांनी वरील प्रतिपादन केले. कॅप्टन आशिष दामले यांच्या पुढाकाराने नव्याने उभारण्यात येत असलेल्या दादांना समर्पित साहित्य गौरव ग्रंथालयाच्या सभागृहात हा हृदय सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी माजी नगरसेवक प्रभाकर पाटील, प्रख्यात चित्रकार सचिन जुवाटकर, राम लिये आदी मान्यवर उपस्थित होते.
करोनाच्या या महामारीच्या काळात प्रथमच मी इतक्या लांब आलो आणि पत्रकारांसमोर बोलत आहे असे भारावून गेलेल्या कवी अशोक नायगावकर यांनी सांगितले. त्यांनी यावेळी आपल्या शैलीत तीन कविता सादर केल्या. पत्रकारांनी या काळात शासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून कार्य केले. अनेक उणीवा समोर आणल्या तसेच चांगल्या घटनाही समोर आणल्या. या काळात कार्य करणाऱ्या अन्य घटकांचा सर्वत्र उल्लेख झाला आणि होत आहे. परंतु त्या तुलनेत पत्रकार मात्र दुर्लक्षीत राहिले अशी खंत व्यक्त करून अशोक नायगावकर पुढे म्हणाले कॅप्टन आशिष दामले आणि श्याम जोशी यांनी पत्रकारांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून सत्कार केला हे अतिशय योग्य झाले.
पत्रकारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक गोष्टी उजेडात आणल्या आहेत. या काळात एक खंत सतत जाणवत आहे ती म्हणजे या काळात अगदी लहान मुले म्हणजे नवजात मुलांपासून दहा बारा वर्षाच्या आतील जी मुले खेळण्याच्या, बागडण्याच्या वयात घरात अडकून पडली होती. अशा सर्व मुलांची मानसिकता काय झाली असेल आणि अशा सर्व मुलांचे भवितव्य कसे असेल याबाबत पत्रकारांनी अभ्यास करून हि बाब पुढे आणावी असेही अशोक नायगावकर यांनी सांगितले. या सर्व मुलाना आता घराबाहेर पडू द्या, मनसोक्त खेळू द्या, उंच उंच मनोरे त्यांना उभारू द्या असे करताना पडू द्या त्यांना मनसोक्त खेळू द्या अशी सूचनाही अशोक नायगावकर यांनी यावेळी केली.
बदलापूर शहरात पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनी या काळात अतिशय महत्वाची भूमिका बजावली असल्याचे कॅप्टन आशिष दामले यांनी आपल्या मनोगतात सांगितले. विशेष म्हणजे या पत्रकारांमधील बहुतांशी पत्रकार स्वतः करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ते आणि त्यांचे कुटुंबीय आजारी होते. अशाही परिस्थितीत या सर्व पत्रकार बांधवानी प्रशासनाला आणि सर्वसामान्य नागरिकांना मोलाची मदत केली आहे. हि अतिशय अभिमानाची बाब आहे. म्हणूनच आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्याचे निश्चित केले आणि या कार्यक्रमाला कवी अशोक नायगावकर यांनी अतिशय कमी कालावधीत निमंत्रण देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत त्याबद्दल कवी अशोक नायगावकर आणि सर्व पत्रकार बांधवांना मनापासून धन्यवाद देतो असे कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले.
पत्रकारांनी ग्रामीण भागात फिरून आदिवासी बांधवांपासून सर्वानाच चांगले सहकार्य केले आहे. त्यांचे हे कार्य अतिशय महत्वाचे असे आहे. पत्रकार सर्वांची बाजू समाजासमोर आणतात. पण पत्रकारांनी केलेल्या कार्याची दखल त्या मानाने समाजाकडून घेतली जात नाही असे ग्रंथसखाचे प्रमुख विश्वस्त श्याम जोशी यांनी सांगितले. गिरीश त्रिवेदी यांनी यंदाचा साप्ताहिक आहुतिचा ५४ व्वा दिवाळी विशेष अंक हा करोना या विषयावर प्रकाशित करून सर्व बाबींची दखल या अंकात घेतली आहे असेही श्याम जोशी यांनी सांगितले.
अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष पंकज पाटील, चंद्रशेखर भुयार, श्रीकांत खाडे, शरद पवार, संजय साळुंके आदींनी आपले अनुभव यावेळी सांगितले.
सर्व पत्रकारांचा लेखणी, डायरी, पुस्तक, आणि शाल देऊन कवी अशोक नायगावकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.