शहरातील महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न : मनीषा वाळेकर


महिला समुपदेशन केंद्र सुरु : विनामूल्य सेवा उपलब्ध
अंबरनाथ : आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवल्यापासून शहरातील महिलांना न्याय देण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे. महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम नियमित यश्वस्वीपणे राबविले असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा सौ. मनीषा अरविंद वाळेकर यांनी केले. 
     अंबरनाथ पालिके मध्ये "महिला समुपदेशन केंद्र" सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उदघाटन माजी नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यावेळी मार्गदर्शन करतांना सौ. मनीषा वाळेकर यांनी वरील प्रतिपादन केले. उल्हासनगर न्यायालयातील  तालुका विधी सभासद सौ. गुलाब अनंत जाधव, सौ. स्नेहल श्रीपाद उपासनी यांची या केंद्रात समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन अतिक्रमण विभागाचे प्रमुख संदीप कांबळे यांनी केले. महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रमुख मधुरा जोशी, पालिकेच्या विधी सल्लागार एड. सौ. साधना निंबाळकर, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. मालती पवार, उपशहर संघटक सौ. चंदा मिलींद गान, भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षा सौ. सुजाता भोईर, सौ. सरिता चौधरी, सौ. सुवर्णा सुभाष साळुंके, सौ. रोहिणी भोईर, श्रीमती शिरूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
       सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करताना मिळालेल्या प्रत्येक संधीतून महिला सक्षमीकरणाबाबत कार्य केले असल्याचे माजी नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर आपल्या भाषणात म्हणाल्या. शहरातील महिलांना आपल्या पायावर उभे रहाण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. अंबरनाथ शहर हे स्त्री अत्याचारमुक्त शहर करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. स्त्री अत्याचार मुक्त राहिली पाहिजे हाच ध्यास कायम राहिला आहे. याच अनुषंगाने महिला  व बाल कल्याण विभागाच्या मदतीने समुपदेशन केंद्र सुरु केले आहे. हे केंद्र महिलांना विनामूल्य मार्गदर्शन करणार आहे. या केंद्राचा शहरातील महिलांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्षा सौ. मनीषा वाळेकर यांनी केले. 
     शहरातील घरगुती वाद, हिंसाचार, कौटुंबिक हिंसाचार आदींच्या बळी ठरणाऱ्या महिलांना योग्य समुपदेशन करणे, व कायदेशीर सल्ला देणे यासाठी हे समुपदेशन केंद्र सुरु केले असून मान्यवर अधिकारी या साठी सेवा देणार आहेत हे अतिशय चांगले कार्य असल्याचे पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले. सदर केंद्रात आपल्यावरील झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागणे आणि कायदेशीर सल्ला घेण्यासाठी शहरातील महिलांनी विनासंकोच या समुपदेशन केंद्रास संपर्क साधावा असे आवाहन डॉ. धीरज चव्हाण यांनी केले. हि सेवा विनामूल्य उपलब्ध असल्याचेहो चव्हाण यांनी सांगितले. 
   महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रमुख मधुरा जोशी, एड. सौ. साधना निंबाळकर, आदींनी या समुपदेशन केंद्राची कार्यप्रणाली यावेळी समजावून सांगितली. 

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...