अंबरनाथ - शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत जाणाऱ्या संख्येने भितीचे वातावरण असताना , अंबरनाथच्या उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठले आहे. अशा परिस्थितीतही हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेऊन कामावर कोणत्याही प्रकारे परिणाम होऊ दिलेला नाही.
अंबरनाथला प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात २२ अधिकारी , कर्मचारी कार्यरत आहेत . मात्र १५ मार्चपासून या कार्यालयाला कोरोनाने विळखा घातल्याने विविध ठिकाणांहून येणारे सहा कर्मचारी टप्प्याटप्याने कोरोना बाधित झाले. ऐन मार्च महिना असल्याने कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर होता, तरीही कामात खंड पडू न देता जीवावर उदार होऊन कार्यालयातील सहकारी कर्मचाऱ्यांनी कामावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ दिला नाही. कार्यालयातील सहकाऱ्यांना कोरोना झाल्याचे समजल्यानंतर कार्यालय सॅनिटायझर करून घेण्यात आले . आणि कामाशिवाय नागरिकांनी कार्यालयात येऊ नये असा फलक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आला आहे. मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोरोनामुळे शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी बंधनकारक असल्याचा निर्णयाची अमलबजावणीचा निर्णय होण्याआधीच कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळल्याचे चित्र पहावयाला मिळते.