सुभाष पवार यांचा दणदणीत विजय, भाजपाच्या उल्हास बांगर यांना अवघी १३ मतं


भाजपाचा आव्हानाचा प्रयत्न फोल


#टीडीसीसीबॅंकनिवडणूक 

मुरबाड, : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (टीडीसीसी) मुरबाड-प्राथमिक कृषि पतपुरवठा मतदारसंघातून महा्परिवर्तन पॅनलमधील शिवसेनेचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी ५६ मते मिळवून दणदणीत विजय मिळविला आहे. मुरबाडमधून सुभाष पवार यांना रोखण्याचा भाजपाचा प्रयत्न फोल ठरला असून, भाजपाचे उमेदवार व बॅंकेचे माजी अध्यक्ष उल्हास बांगर यांना अवघी १३ मते मिळाली.
टीडीसीसी बॅंकेच्या संचालकपदासाठी २०१५ मध्ये सुभाष पवार यांची पहिल्यांदा निवड झाली होती. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद सोपविण्यात आले. त्यांनी शिक्षण व अर्थ खात्याबरोबरच केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्यांची अडीच वर्षानंतर उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली होती. मुरबाडमधून चार वेळा आमदारकी भूषविलेले गोटीराम पवार यांच्या कार्याचा वसा सुभाष पवार यांनी मुरबाडमध्ये यशस्वी व नियोजनबद्धरित्या सुरू केला होता. त्यामुळे त्यांना बॅंकेच्या संचालकपदापासून रोखण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात होते. भाजपाने संपूर्ण ताकद मुरबाडमध्ये लावली होती.
बॅंकेचे माजी अध्यक्ष उल्हास बांगर यांना भाजपाने २०१५ नंतर यंदाही पुन्हा उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी सुभाष पवार यांच्यावरच पुन्हा विश्वास ठेवून उमेदवारी दिली होती. तो विश्वास सार्थ ठरवून सुभाष पवार यांनी ६९ पैकी ५६ मते मिळवून दणदणीत विजय मिळवून भाजपच्या नेत्यांना चारीमुंड्या चित केले. भाजपाच्या उल्हास बांगर यांना अवघ्या १३ मतांवर समाधान मानावे लागले.
-----------------
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार : सुभाष पवार

पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्याबरोबर माझे वडील गोटीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मिळविलेला हा विजय आहे. त्यांच्या विचारानुसारच बॅंकेत पुढील पाच वर्षात शेतकऱ्यांची प्रगती अल्प दरात कर्ज यासाठी कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर बॅंकेला राज्यात अव्वल क्रमांक मिळवून देण्यासाठी झटणार आहे.
- सुभाष गोटीराम पवार,
नवनिर्वाचित संचालक,
मुरबाड
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, ठाणे

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...