कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने होत असल्याने बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयानुसार, राज्यात शिक्षण घेत असलेल्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आहे. याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली.
पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत, आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, खरंतर या मुलांचं वर्षभराचं मुल्यमापन बघितले पाहिजे, परंतु यंदाची परिस्थिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे यंदा हे करणं शक्य नाही. म्हणून शनिवारी आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून असा निर्णय घेत आहोत की, राज्यातील जे पहिली ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाऱाच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील वर्गात पाठवण्यात येत आहे. असे देखील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल.असे ही यावेळी सांगितले.