अंबरनाथ नगरपालिकेची नवीन नियमावली लागू
अंबरनाथ,- अंबरनाथ शहरात रस्त्यावर थुंकल्यास यापुढे एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत , तर मास्क वापरला नाही तर ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे ,लग्नसमारंभाला देखील ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शासनाच्या निर्णयानुसार अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्याची कडक अमलबजावणी करण्याचे निर्देश नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
अंबरनाथ शहरामध्ये गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, या रुग्णवाढीला आला घालण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने मंगळवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाय योजनांची अमलबजावणी करा असे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. यानुसार आज गुरुवारी नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी कोरोना रुग्ण वाढ रोखण्याच्या दृष्टीने सहा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून ३२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
मास्कचा वापर न केल्यास ५०० रुपये तर उघड्यावर थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारणी करण्याचे आदेश यावेळी दिले आहेत . याशिवाय सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टेंसिंगचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती , दुकानदार याना दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कार्यक्रम लग्न समारंभासाठी केवळ ५० नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे , याठिकाणी देखील कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून याशिवाय ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे.