विशाखापटनम - पॉलिमर कंपनीत झालेल्या विषारी गॅस गळतीमुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ वर्षांच्या एका मुलीसह दोन जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एकूण ५००० जणांना या गॅस गळतीची बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी २० जण गंभीर आहेत. या विषारी वायूच्या गळतीमुळे तीन किमीच्या परिसरावर परिणाम झाला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
ही घटना आज सकाळी घडली.
आर. आर. वेंकटपुरम येथे असलेल्या विशाखा एल. जी. पॉलिमर कंपनीत ही विषारी वायूची गळती झाली आहे. या विषारी वायूमुळे शेकडो लोकांना डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक जेथे होते तेथेच कोसळले. एकीकडे करोनाचा उद्रेक झालेला असताना ही दुर्घटना अचानक घडल्याने सगळीकडे हाहाकार उडाला.
या दुर्घटनेत २० लोक गंभीर असून यात बहुतेक जेष्ठ नागरिक आहेत. काही लोकांना गोपालपुरमच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक लोकांच्या उपचारासाठी रुग्णालयात १५०० ते २००० बेडची व्यवस्था करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.