बदलापूर: बदलापूरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे बदलापुरात आणखी कोविड केअर सेंटरची आवश्यकता असल्याने बदलापूर पूर्वेकडील तालुका क्रीडा संकुलात १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी भाजपाचे माजी शहराध्यक्ष व ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी केली आहे.
बदलापूरात गेल्या १५ दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदलापूर पश्चिमेकडील सोनिवली येथे नगर परिषदेच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असले तरी तेथे ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांना खाजगी रुग्णालयांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अलीकडेच महाराष्ट्र शासनाने नगर परिषदेला ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या निधीतून सोनिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये १५० बेडची व्यवस्था करणे तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा देणे शक्य आहे. त्याचबरोबर कारमेल शाळेसमोर असलेल्या तालुका क्रीडा संकुलातही सर्व सोयीसुविधायुक्त कोविड केअर सेंटरची उभारणी करणे शक्य आहे. याठिकाणी उपलब्ध असलेल्या इमारतीत डॉक्टर व रुग्णालय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करता येऊ शकेल, तसेच उर्वरित जागेत बेडची उभारणी करणे शक्य होईल,असे संभाजी शिंदे यांचे म्हणणे आहे.त्याचप्रमाणे बदलापूर जवळील चामटोळी येथे सुरू करण्यात आलेले कोविड डेडीकेटेड खाजगी हॉस्पिटल नगर परिषदेने ताब्यात घेतल्यास कोरोनाबधितांवर चांगल्याप्रकारे उपचार करणे शक्य होईल,असेही शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या यांना निवेदन सादर केले असल्याची माहितीही संभाजी शिंदे यांनी दिली.
बदलापुरात मच्छी मार्केट, भाजी विक्रेते व रस्त्यावरील फेरीवाले यांच्याकडून सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नासल्याकडेही संभाजी शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस व नगर परिषदेच्या समन्वयाने याठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे पालन होईल, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी संभाजी शिंदे यांनी केली आहे. गर्दीच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या तसेच सॅनिटायजर वा हँडवॉश उपलब्ध करून देऊन नागरिकांना हात धुण्याची व्यवस्था करून द्यावी, खरेदी व इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही धूळ खात पडलेल्या बायोटॉयलेटची उभारणी करून नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य थंडी तापाच्या रुग्णांची होत असलेली प्रचंड गैरसोय टाळण्यासाठी विभागवार फिवर तपासणी क्लिनिक सुरू करण्यात यावे, आदी मागण्याही आपण निवेदनाद्वारे केल्या असल्याचे संभाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.