बदलापूर :- कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता शहरात पालिका प्रशासनाने घरोघरी जाऊन प्राथमिक चाचणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सात दिवसांत पालिकेच्या टीमने ३३,२३१ घरांमध्ये जाऊन ९४८८३ नागरिकांची तपासणी केली आहे.यातील केवळ ३५ नागरिक संशयित आढळले आहेत, अशी माहिती नगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
"दहा दिवसांची ही विशेष मोहीम असून यात दोन सदस्यांचे एक पथक अशी 107 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाच्या सदस्यांना थर्मामीटरपासून सर्व आवश्यक ते साहित्य पुरविण्यात आले आहे. आज एकूण ९८ पथकांनी, ४८०६ कुटुंबातील ३३,२३१ व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. आतापर्यंत १४,४२९ कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण झाले असून सर्वेक्षणाच्या माध्यमातून ९४,८८३ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यातील केवळ ३५ व्यक्ती संशयित म्हणून आढळले आहेत.यापुढे उर्वरित सर्व कुटुंबीयांचीसुद्धा तपासणी करण्यात येणार आहे" असे उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी सांगितले आहे. पालिकेच्या पथकांकडून चांगले काम सुरु असून त्याला नागरिकांचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जगतसिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या खाते प्रमुखांची नुकतीच बैठक झाली. यावेळी गिरासे यांनी अधिकाऱ्यांना या योजनेची सविस्तर माहिती समजावून सांगितली. यावेळी मुख्याधिकारी दीपक पुजारी, जयेश भैरव, डॉ. राजेश अंकुश, डॉ. हरेश पाटोळे, राजेंद्र बोरकर, प्रवीण वडगाये, दशरथ राठोड, किरण गवळे, सुरेंद्र उईके, सिद्धार्थ पवार, विलास मुठे, प्रतीक्षा सावंत आदी अधिकारी उपस्थित होते.
शहरातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक, शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी सदस्य आणि शहरातील नागरिक देखील पालिकेच्या पथकांमधील सदस्यांना सर्व माहिती देऊन सहकार्य करीत आहेत