बदलापूरः भांडवली अंशदानाबाबतचा रखडलेला निर्णय, अमृत योजनेच्या टप्पा दोनची रखडलेली कामे यामुळे बदलापुरसारख्या शहरातील विस्तारीत भाग तहानलेला आहे. त्यामुळे याभागातली गृहसंकुलांना टँकरने पाणी पुरवठा केल्याशिवाय पर्याय नाही. मात्र काही टँकर माफियांकडून नागरिकांना पाणी पुरवठा करताना जे टँकर रहिवासी भागात पिण्यासाठी पाठवले जाते तेच टँकर बांधकामाच्या ठिकाणीही पाणी पुरवत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे तेच टँकर शहरातल्या एका खड्ड्यातून दुषीत पाणी भरतानाही एका सुज्ञ नागरिकाच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली आहे. टँकरमाफियांची ही बनवाबनवीमुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
बदलापूर शहराला उल्हास नदीवर उभारलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी पुरवठा केले जाते आहे. पुरेसे पाणी असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात उंच भागा बारमाही पाणी टंचाई असते. शहरात गेल्या काही वर्षात नवनवी गृहसंकुले उभी राहिली असून त्यांना पाणी पुरवठा करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची दमछाक होते आहे. त्यात शहरात नव्या नळजोडण्या देण्यासाठी भांडवली अंशदानाचा खर्चिक निर्णय घेण्यात आला होता. त्यामधून दिलासा मिळण्यासाठी आजही बदलापुर शहरातील नागरिक प्रतिक्षेत आहेत. त्याबाबत अजूनही निर्णय होत नसल्याने गृहंसुकले नव्या जोडण्यात घेत नाहीत. त्यामुळे नव्या आणि विस्तारीत शहरातील गृहसंकुलांमध्ये पाणीटंचाई गंभीर होते आहे. त्यावर टँकर हा एकच पर्याय सध्या अवलंबला जातो आहे. मात्र शहरात पाणी पुरवठा करणारे टँकर व्यावसायिकांकडून टँकरद्वारे पाणी पुरवताना बनवाबनवी केली जात असल्याचे दिसून आले आहे. बदलापूर पूर्वेतील शिरगाव भागात गृहसंकुलाला पाणीपुरवठा करणारा टँकर बाँधकामाच्या ठिकाणीही पाणीपुरवठा करताना आढळला आहे. एका सुज्ञ नागरिकाने केलेल्या पाहणीत ही बाब आढळली. त्या टँकरबाबत अधिक माहिती घेत असतानाच हाच टँकर एका खड्ड्यातून दुषीत पाणी भरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमच्या संकुलात पाणी पुरवठा करणारा टँकर आणि खड्ड्यातून पाणी उपसा करणारा टँकर यांचे क्रमांक एकच असल्याचे आमच्या पाहणीत निदर्शनास आल्याची प्रतिक्रिया या सुज्ञ नागरिकाने दिली आहे. त्यामुळे रहिवासी संकुलांना पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली देण्यात येणारे पाणी खरेच पिण्यायोग्य असते का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. टँकर माफियांच्या या बनवाबनवीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारींचा पाऊस पडत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे टँकर माफियांच्या कारभारावर लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.