अंबरनाथ : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने नुकतेच आपले वर्षपूर्ती साजरी केली परंतु राज्यात महाविकास आघाडी म्हणून सत्तेत असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षांचे अंबरनाथ शहरात मात्र सख्य नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहे. पाणी प्रश्नावरून अंबरनाथच्या स्थानिक पातळीवर शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील वाद उफाळून आला आहे.शिवसेना आमदाराला मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
अंबरनाथ शहरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने काँग्रेसने आज पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. शहरातील अनेक भागात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या तीव्र होत असल्याने नागरिकांना यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करताना दुजाभाव करत आहे, असा आरोप करत पाणी टाकीवर चढून काँग्रेसने पाणी पुरवठा विभागाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
शहरातील इतर समस्या नगरसेवक सोडवतात, आमदारांनी निदान पाणी प्रश्न तरी सोडवावा, मात्र निवडून आल्यानंतर आमदारांना अहंकार आल्याने त्यांना कोणाची गरज नाही, खासदार आणि पालकमंत्र्यांनी आमदारांना समज द्यावी अन्यथा मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा अंबरनाथ काँग्रेसने दिला आहे.
