अंबरनाथ मध्ये भर दिवसा ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा, 25 तोळे सोने पळून नेले

अंबरनाथ :- येथील सर्वोदय नगर भागातील भवानी ज्वेलर्स या दुकानावर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने शहरात खळबळ माजली आहे.  भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून  २५ तोळे  सोने घेऊन दरोडेखोर फरार झाले आहेत.दरोडेखोर आणि दुकानमालक यांच्यात झालेल्या झटापटीमध्ये तीन जण जखमी झाले, भरदिवसा  प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
    अंबरनाथच्या चिखलोली परिसरातील सर्वोदयनगरमधील तुलसी सानिध्य कॉम्प्लेक्समधील भवानी ज्वेलर्समध्ये आज रविवारी   दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला दरोडा पडला. 
 मोटार सायकलीवरून आलेल्या तीन ते चार  अज्ञात इसमांनी पिस्तूल, चाकूसारख्या धारधार शस्त्रांच्या सहाय्याने दुकानांमध्ये  प्रवेश केला, यावेळी आरोपींकडे पिस्तूल , चाकू यासारखी हत्यारे होती. मात्र दुकानात असणाऱ्यांनी प्रतिकार करून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांच्याकडील चाकूने केलेल्या हल्ल्यात दुकानातील तीन जण जखमी झाले, आरडाओरडा केल्याने आरोपींनी गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आणि दुकानातील अंदाजे २५ तोळे सोन्याचे दागिने पळवून फरार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 
    भवानी ज्वेलर्स दुकानाबाहेर  एक पिस्तूल, निकामी काडतुसे, चाकू आणि चपला टाकून  दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. घटना समजताच अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस उपयुक्त विनायक नरळे, अंबरनाथचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्यासह मोठ्या  संख्येने पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
  घटनेनंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली असून  लवकरच या प्रकरणाचा छडा  लावू, पाच विशेष पथके तयार करण्यात आली असून तपास करण्यात येत आहे , घटनेत जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. 
         लक्ष्मण  सिंग (३०) , वसंत सिंग (२६) , भैरव सिंग (२२) हे तिघे  दरोडेखोरांनी केलेल्या  हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...