आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश
अंबरनाथ ( पूर्व ) येथील सूर्योदय गृहनिर्माण संस्था यांना निवासी प्रयोजनार्थ वाटप करण्यात आलेल्या ६३० भूखंडावरील विविध स्वरूपाचे आढळून आलेले शर्तभंग नियमानुकूल करण्याकरिता महसूल विभागाच्या दि.१३/०४/२०१७ च्या शासन निर्णयास मुदतवाढ मिळण्याकरिता पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर हे सातत्याने पाठपुरावा करत होते या पाठपुराव्याच्या अनुषंगाने सोमवारी महसूल विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करत सूर्योदय गृहनिर्माण संस्थेतील सदनिका नियमानुकुल करण्याच्या शासन निर्णयास दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे.
सूर्योदय सोसायटीतील निवासी प्रयोजनार्थ वाटप करण्यात आलेल्या भूखंडावर विविध स्वरूपाचे बांधकाम करण्यात आल्याने या गृहनिर्माण संस्थेवर सन : २००५ पासून शर्तभंगाचा ठपका ठेवत विक्री, हस्तांतरण व विकास करणे यावर शासनाने बंदी घातली होती. ही बंदी उठविण्याकरिता आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सन : २०० ९ पासून शासन स्तरावर , मा.विभागीय आयुक्त व मा.जिल्हाधिकारी यांचे स्तरावर वेळोवेळी निवेदने देऊन व सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्र .: जमीन २७०६ / प्र . क्र .६६ / ज -४ , दि .१३ / ०४ / २०१७ रोजी शासन निर्णय पारित करत या गृहनिर्माण संस्थेची शर्तभंग नियमितीकरणाची योजना यापूर्वी झालेल्या हस्तांतरणासाठीच व या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त तीन वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजेच दि .१२ / ०४ / २०२० रोजी पर्यंतच लागू राहतील असे निर्देश दिले होते. परंतु , या शासन निर्णयाच्या अनुषंगाने दिलेले निर्देश व त्यामधील अटी शर्ती समजून घेण्यातच अधिक वेळ गेला होता. तसेच या शासकीय जमिनीवर स्थानिक नियोजन प्राधिकरणा मार्फत परवानगी घेऊन उभारण्यात आलेल्या बहुमजली इमारतीपैकी काही इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने सदरच्या भूखंडाचे नियमतीकरण करणे शक्य झालेले नव्हते. सूर्योदय गृहनिर्माण संस्थेतील भूखंडांची संख्या विचारात घेता तीन वर्षांच्या कालावधी मध्ये सर्व भूखंडाचे नियमितीकरण करणे शक्य नसल्याने या शासन निर्णयाचा कालावधी वाढवणे आवश्यक होते. त्यातच गेल्या वर्षभरात पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या आचार संहिताच्या काळ, तसेच गेल्यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा काळ व सद्यस्थितीत उदभवलेली कोरोना महामारीची परिस्थिती या काळात आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी स्तरावर काम सुरू असल्याने शर्तभंग नियमितीकरणाची कामे होऊ शकलेली नाही. तसेच अंबरनाथ येथील सूर्योदय गृहनिर्माण संस्था व ठाणे जिल्ह्यातील इतर गृहनिर्माण संस्थेतील शर्तभंगाची प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता या शासन निर्णयाला मुदतवाढ मिळणे गरजेचे होते. याकरिता आमदार डॉ. किणीकर यांनी शासन स्तरावर सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सूर्योदय सोसायटी मधील सदनिका धारकांना यामुळे दिलासा मिळणार असून शासनाला ही मोठ्या प्रमाणावर महसूल मिळणार असल्याचे आमदार डॉ. किणीकर यांनी यावेळी सांगितले.