बदलापूर: बदलापूरकरांना आता शेतातील ताजा भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कर्जत यांच्या पुढाकाराने ही योजना राबविण्यात येणार असून त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनाही हक्काची बाजरपेठ उपलब्ध होणार आहे.
संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारीत थेट शेतकरी ते ग्राहक या उपक्रमाचा मंगळवारी( ता.२) सकाळी १० वा. हेंद्रेपाडा येथील अयोध्या नगरी बिल्डिंग समोरील मैदानात शुभारंभ झाला आहे. या बाजारात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील भाजीपाला,फळे, गावठी अंडी व शेती पूरक व्यवसायांची इतर उत्पादने विक्रीसाठी ठेवता येणार आहेत.
शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांकडे शेतमाल व इतर उत्पादने येणार असल्याने बाजारभावाच्या तुलनेत तो स्वस्त असणार आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे ताजा शेतमाल ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांना बाजरपेठ उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनाही रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्राहक व शेतकरी या दोघांचेही या उपक्रमामुळे हित साधले जाणार आहे. दर रविवारी ही बाजरपेठ सुरू राहणार असून बदलापूरकरांनी या बाजारात शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे,असे आवाहन कृषी विभाग यांनी केले आहे.