राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्या लोकांसाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा

 



महाविकास आघाडी सरकरचा मोठा निर्णय


राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडलेल्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी सोमवारपासून एस. टी. सेवा सुरु करण्यात आली आहे. हा प्रवास मोफत असणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. करोना आणि लॉकडाउनमुळे विविध जिल्ह्यांमध्ये अडकलेले लोक, विद्यार्थी, मजूर या सगळ्यांसाठी ही एसटी सेवा असणार आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रातल्या लोकांना हा प्रवास करता येणार नाही. रेड झोनमधल्या लोकांना प्रवास करायचा असेल तर त्यांची चाचणी होणार असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.


महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सोमवारपासून एसटीद्वारे लोकांना आपल्या गावी जाता येणार आहे. यासाठी लोकांनी २२ जणांची एक यादी तयार करावी. शहरातल्या लोकांनी ही यादी पोलीस ठाण्यात तर गावातल्या लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे द्यावी. यामध्ये मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यात कोणत्या ठिकाणी जायचं आहे? ही सगळी माहिती नोंदवायची आहे असंही परब यांनी सांगितलं.


मुंबई आणि पुण्यात करोना प्रतिबंधित क्षेत्रं आहेत. या ठिकाणच्या लोकांना प्रवास करता येणार नाही. रेड झोनमधल्या प्रवाशांचं थर्मल स्क्रिनिंग केलं जाईल. त्यानंतर त्यांना प्रवास करण्याची संमती दिली जाईल. तसंच प्रवाशांना प्रवासादरम्यान मास्क लावणं अनिवार्य असणार आहे असंही त्यांनी सांगितलं.


लॉकडाउन संपेपर्यंत प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे असा निर्णय घेतला गेल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. १८ तारखेपर्यंत विविध जिल्ह्यात अडकून पडलेले लोक हे त्यांच्या घरी पोहचतील यासाठी सोमवारपासून एस.टी. सुरु करण्यात येणार आहेत. प्रत्येक बसचं प्रवासाआधी आणि नंतर निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे असंही परब यांनी स्पष्ट केलं. तसंच एका बसमध्ये साधारण २२ प्रवासी असतील जे विशिष्ट अंतर राखूनच प्रवास करतील असंही त्यांनी सांगितलं.


Featured Post

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठीठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम मतदार ...